बोगस बांधकाम कामगार नोंदणीचा आरोप ; चौकशीची मागणी ; कामगार आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा वंचितचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज | मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घर ते घर बांधकाम कामगारांची नोंदणी बोगस झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांना आर्थिक लाभ देण्यात आल्यामुळे योग्य कामगार मात्र लाभापासून वंचित राहत आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी कुठेही बांधकाम कामगार म्हणून काम केले नाही, तरी सुद्धा त्यांची बोगस नोंदणी करून त्यांना आर्थिक साहाय्य देण्यात आले. ग्रामीण भागात घर ते घर बोगस नोंदणी करून त्यांना ताबडतोब भांडी संच तसेच इतर आर्थिक लाभ देण्यात येत आहे. मात्र, ,खऱ्या बांधकाम कामगारांना वरचेवर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आपल्या हाडांची काडी होईपर्यंत वारंवार फेऱ्या मारावे लागत आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी हे बांधकाम कामगारांच्यावर मेहरबानी करत आहेत. अशी वागणूक देत आहेत. बांधकाम कामगार हा खरा हकदार असतानाही त्यांना आपल्या हक्काच्या कल्याणकारी योजनांच्या पासून वंचित राहावे लागत आहे. निष्कारण अन्याय सहन करावा लागत आहे.
अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याने त्यांनी आजतागायत केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे ते त्या पदावर कार्यरत राहण्यास लायक नाहीत. मिरज तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचा फायदा व्हावा, यासाठी मिरज तालुक्यातील सरपंच यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून बोगस लोकांची नोंदणी केली आहे तसेच काम न करता जाग्यावरच ९० दिवस काम केले असल्याचा सही शिक्का दाखले देण्यासाठी इंजिनिअर उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला सोमवार दिनांक २३/०९/२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत टाळे ठोकण्यात येईल. असा इशारा, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.