टोलनाका तोडफोड प्रकरणातील आरोपी जेरबंद ; वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई
ग्राम तोंडगाव फाट्यावर दहशत माजवणाऱ्या आरोपींना अटक ; ४ लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या गुन्हेगारांना अखेर गजाआड

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाशिम जिल्ह्यातील टोलनाका तोडफोड प्रकरणातील आरोपींना वाशिम पोलिसांनी तडीस नेले असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात धडाकेबाज पद्धतीने पार पडली आहे. दिनांक ८ जुलै २०२५ रोजी वाशिम-हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्याजवळील टोलनाक्यावर दहशतीचे नाट्य घडले होते.
या घटनेत आरोपी गजनन कुंडलिक वैरागडे (वय ४०, रा. चिखली घुले) आणि उमेश सुधाकर टोलमारे (वय २५, रा. शिवाजी नगर, काटा रोड, वाशिम) यांच्यासह एका अज्ञात इसमाने टोल कर्मचाऱ्यांना दमदाटी करत, फिर्यादीच्या खिशातून ५,००० रुपये जबरदस्तीने काढले. त्यानंतर टोलनाक्यावरील बुथची काच फोडून जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०८, ३०९(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन नागरीकांमध्ये घबराट आणि दहशतीचे वातावरण तयार झाले होते. आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर त्यांना शोधणे हे मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी सतत तपासाची चक्रे फिरवत योग्य माहिती गोळा केली.
अखेर १८ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने एक विशेष पथक अकोला जिल्ह्यात रवाना करण्यात आले. तेथील शोध मोहिमेत आरोपी गजनन वैरागडे व उमेश टोलमारे यांना पकडण्यात आले. पोलिसांनी शिताफीने केलेल्या कारवाईमुळे हे आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष पथकात प्रदीप परदेशी यांच्यासह सपोनि जगदीश बांगर, अंमलदार गजानन अवगळे, विनोद सुर्वे, सुरज खडके, आशिष बिडवे, गजानन गोटे, दीपक घुगे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे आणि सुनील तायडे यांनी सहभाग घेतला. सर्वांनी अथक परिश्रम घेऊन आरोपींना गजाआड करण्यास यश मिळवले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे आणि पोशि अनिल बोरकर हे सपोनि श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. वाशिम पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.