ठराव फक्त दोनजणांचा ; भ्रष्टाचार मात्र, जनतेच्या जीवाचा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
मिरज | खटाव तालुक्यात मिरज येथील ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्या कारभाराविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आवाज बुलंद केला असून, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आता थेट मंत्रालयावर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. विरोधी पक्षाचे नेते परशुराम बनसोडे यांनी ग्रामसेवकाच्या कामाचा भांडाफोड करणारे कॉल रेकॉर्डिंग उघड करत गावात कसा भ्रष्टाचाराचा सुळसुळाट सुरू आहे हे समोर आणले आहे.
गावाच्या विकासाच्या नावाखाली ग्रामसेवकाने स्वतःच पोट ठेकेदार बनून कामे हडप केली आहेत. सुरुवातीला चांगलं काम करणाऱ्या ग्रामसेवकाचा चेहरा ठेकेदारीच्या हव्यासापुढे बदलला. त्यात गावातील विरोधी सदस्य, संजय कागवाडे यांच्यासह अनेकांनी भ्रष्टाचाराला विरोध केला. मात्र, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी लोकशाही प्रक्रियेचा अपमान करत फक्त दोघांनीच मासिक मिटिंग घेऊन निर्णय रेटून नेले.
सोमेश्वर तीर्थक्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला असता, सरपंच त्यालाच ‘नोटंकी’ म्हणत सुटले. गावात सिमेंट रस्त्याला नांगर मारला गेला हे काय विकास आहे की विनाश?
ग्रामपंचायतीने 14 लाख रुपये खर्चून स्मशानभूमी शेजारी रस्ता केला, तो देखील योग्य मोजमाप न करता, विरोध असूनही रेटून नेला. चौकशी अहवालात गट विकास अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार स्पष्टपणे नमूद केला आहे. पण ग्रामसेवक सहानुभूती मिळवण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग वायरल करत फिरतो आहे.
विरोधी पक्ष आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार म्हणजे लोकशाहीची गळचेपी आणि निधीची लूट आहे. आम्ही हे सगळं खपवून घेणार नाही. खटावकर जनता सुज्ञ आहे आणि भुलाव्याच्या गोष्टींना बळी पडणार नाही.
आता हे प्रकरण उच्च न्यायालयात घेऊन जाण्याची तयारी सुरु असून, ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाईसाठी याचिका दाखल केली जाणार आहे. ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही तक्रारींची पाठपुरावा करण्यात येणार आहे.
तसेच सगळ्यात थरकाप उडवणारी बाब म्हणजे येत्या १५ तारखेला मंत्रालय मुंबई येथे जर कारवाई झाली नाही, तर परशुराम बनसोडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. माझ्या जीवाला काही झाले, तर त्यास संपूर्ण जबाबदार ग्रामसेवक, सरपंच व जिल्हा प्रशासन असतील, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.