गुन्हे विश्व्विदर्भ

नवरी नव्हे ठगिणी ; रिसोड पोलिसांनी उघड केला आंतरराज्यीय ‘लग्न फसवणूक टोळी’चा डाव

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

लग्नाचे गोड अमिष दाखवून वरपक्षाला अक्षरशः कंगाल करणाऱ्या आंतरराज्यीय ठग टोळीचा पर्दाफाश रिसोड पोलिसांनी केला आहे. एकट्या रिसोडमध्येच लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करून पळ काढलेल्या या ‘नवरी टोळी’ला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून दागिने व रोख माल जप्त करण्यात आला आहे.

दि. २१ जुलै २०२५ रोजी रिसोड येथील सातारकर महाराज संस्थान येथे अगदी ढोल-ताशांसह लग्नाचा दिखावा करून फिर्यादी अजय भैराने यांची ‘नवरी’ बनून आलेल्या ठगिणींनी लग्नविधी संपल्यावर मध्यरात्रीच पलायन केले. या टोळीने नगदी १.२५ लाख, सोन्या-चांदीचे दागिने ४४ हजार आणि कपडे ११,५०० रुपये असे एकूण १.८० लाख रुपयांचा माल लंपास केला.

फिर्यादीने तक्रार दाखल करताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून या लग्नगुन्ह्याचा तपास सुरू केला. अपर पोलीस अधीक्षक लता फड व सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि संतोष आघाव व पथकाने कसून तपास सुरू केला.

शेवटी ठगिणींचा खेळ उघड झाला. या प्रकरणी शारदा तनपुरे (बुलढाणा), मनिषा आठवे (परभणी), पूजा लिपत्रेवार (मानवत, परभणी) आणि लग्नातील बनावट मामा ठरलेले श्रीरंग हिवाळे (जालना) यांना जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी या आरोपींकडून ४३,८०० रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

या टोळीविरुद्ध आधीच महाराष्ट्रातील बीड, जालना, परभणी तसेच मध्यप्रदेशात अनेक गुन्हे दाखल असून ही ‘नवरी टोळी’ म्हणजेच फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड व सहायक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रिसोडचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण, तपास अधिकारी सपोनि संतोष आघाव, सपोउपनि मिना पाथरकर, जमादार शारदा आखाडे, कॉन्स्टेबल रवि इरतकर, बेले, महीला सुषमा गायकवाड व कांचन डोंगरदिवे यांनी ही कारवाई केली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही