डॉल्बी नशेची दंगलधिंड वाजवणाऱ्यांना ‘पीएम श्री’ ने दिला आवाज बंदचा झटका
मिरजमध्ये ध्वनिमुक्त-नशामुक्त गणेशोत्सवासाठी जनजागृतीचा प्रचंड एल्गार !...

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | मिरज शहरात गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्तीचा नव्हे, तर बेशिस्त डॉल्बीचा आणि नशेत बेधुंद तरुणाईचा गोंधळ असा काहीसा विचित्र समज पसरू लागला असताना, ‘पीएम श्री मिरज हायस्कूल’ने या गोंगाटाला थांबवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरत प्रबोधनाचा झंझावात उठवला आहे.

सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त आणि शाळेच्या प्रशासक सन्माननीय स्मृती पाटील यांच्या प्रेरणेतून, आणि पोलीस विभागाच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या साथीत ध्वनिमुक्त, नशामुक्त आणि आनंदी गणेशोत्सवासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
डॉल्बी हटवा, नशा मिटवा, मिरज वाचवा !…
रॅलीचे नेतृत्व DYSP प्रणिल गिल्डा, वाहतूक शाखेचे गिड्डे साहेब, पोलीस निरीक्षक रासकर, तसेच विशेष सहभागात “पोलीस दीदी’ आणि ‘पोलीस काका’ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ही रॅली केवळ ढोल-ताशा आणि गोंगाटाशिवाय साजरी झाली नाही, तर शिस्तबद्ध घोषणांनी शहर हादरले.

“नशेची गोळी, करी जीवनाची होळी !”,
“आनंदी गणेशोत्सव, डॉल्बीशिवायही होतोय भव्य-दिव्य !”,
“गणपती बाप्पा मोरया, नशामुक्त समाज घडवूया !”
अशा घोषणा देत 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी मिरज शहरात जागृतीचा झेंडा फडकवला. रॅली गणपती तलावापर्यंत नेताना शिस्तबद्ध पथसंचलन, रंगीत फलक, आणि सामाजिक संदेश देणारे बॅनर यामुळे मिरजकर थक्क झाले.
मुख्याध्यापकांचा ठाम संदेश, उत्सवात जबाबदारी
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी रॅलीपूर्वी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “सण साजरे करताना समाजाचं भान ठेवायला शिका. श्रद्धा ही आरडाओरडीत नाही, तर संस्कृतीच्या सन्मानात असते!”
‘पोलीस दीदी’ च्या मार्गदर्शनाचा लाभ
विद्यार्थिनींसाठी ‘पोलीस दीदी’ने सायबर गुन्हे, आत्मसुरक्षा, कायदे आणि हक्क याची थेट माहिती दिली. रॅलीचा हा भाग विशेष भाव खाऊन गेला.
पोलीस काका’ने जोडली विद्यार्थ्यांशी आपुलकीची नाळ
‘पोलीस काका’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पोलिसांमधील विश्वासाचं नातं दृढ करण्याचा प्रयत्न झाला. रॅलीच्या निमित्ताने विद्यार्थी-पोलिस संवाद अधिक मोकळा झाला.
रॅली नव्हे ही संस्कृतीचा युद्ध
ही रॅली डॉल्बीच्या दणदणाटात हरवलेल्या माणुसकीला सावरण्यासाठी होती. नशेमुक्त आणि आनंदी गणेशोत्सवाच्या बाजूने समाजाला विचार करायला भाग पाडणारी मोहीम होती.
