डॉ.आंबेडकर स्वागत कमानीचे काम थांबवले ; समस्त आंबेडकरी समाज आक्रमक ; कारवाईची मागणी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
पलूस तालुक्यातील खटाव गावातील बौद्ध वसाहत येथे लोकवर्गणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभारणीचे काम सुरु होते. यासाठी ग्रामपंचायतने ठराव देखील मंजूर केला होता. मात्र, गावातील एका व्यक्तीच्या दबावाखाली सदरचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच बांधकाम करण्यास तात्काळ मंजुरी द्यावी, या मागणीसाठी आता समस्त आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हापरिषदेचे सीईओ यांना देण्यात आले आहे. दबावापोटी काम थांबवले तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना डॉ. महेशकुमार कांबळे म्हणाले की, पलुस तालुक्यातील खटाव गावामध्ये बौद्ध समाज बांधवांनी बौद्ध वसाहतीकडे जाणाऱ्या रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान स्वखर्चाने सर्व समाज बांधवांच्या कष्टाच्या पैशाने उभा करण्याचे काम सुरु होते. १४ फुटापर्यंत कमानीचे काम झाले. पण गावातील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्र्यांचा पी.ए. असल्याचे सांगून प्रशासकीय पातळीवर दबाव आणून सदरचे काम थांबवले आहे. आज सर्व खटावमधील आंबेडकरी समाजाने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना निवेदन दिले आहे.
सदरचा रास्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती बांधकाम विभाग यांचा नाही. तो रास्ता समाजाच्या जागेतून जाणारा आहे. त्यावर कमान उभा करण्यासाठी कोणाचा विरोध असण्याचे काम नाही. ग्रामसभेमध्ये ग्राम पंचायतीने बहुमताने कमानीला विरोध नसल्याचा ठराव मंजूर केला आहे. या कमानीला सर्व जातीय बांधवानी पाठिंबा दिला आहे. मात्र, एकट्या व्यक्ती मुळे सदरच्या कमानीचे काम थांबले आहे. आंबेडकरी समाजाच्या नादाला लागू नका. बीडीओ अरविंद माने हे ग्राम सेवकांवर दबाव टाकत आहेत. कोणतीही तक्रार नसताना केवळ दबावापोटी काम थांबवण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून काम पूर्ण करेल, असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.