डोंगरी परिषद उद्या उधवणेत ; मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
पाटण | पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढेबेवाडी विभागातील राजकीय हालचालींना वेग आला असून, उद्या शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २ वाजता ढेबेवाडी विभागातील महत्त्वपूर्ण डोंगरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पालकमंत्री तसेच पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री आदरणीय नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत निर्णायक मानली जात असून, स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा, तसेच पुढील राजकीय दिशा यावर मंत्री देसाई थेट संवाद साधणार आहेत. विशेषतः डोंगरी व दुर्गम भागातील समस्या, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षण यासारख्या ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.
ही डोंगरी परिषद उधवणे येथील विजय साळुंखे (सरपंच) यांच्या घराशेजारी, वाल्मिक रोड येथे संपन्न होणार आहे. या परिषदेला ढेबेवाडी विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमुळे या परिषदेला राजकीय वजन प्राप्त झाले असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत ही बैठक शक्तिपरीक्षा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढेबेवाडी विभागात शिवसेना (शिंदे गट) संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या परिषदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
या परिषदेमुळे आगामी निवडणुकीच्या प्रचाराला अधिक धार मिळणार असून, स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.