क्राईमगुन्हे विश्व्महाराष्ट्र

भिवघाट-विजापूर रोडवर विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

कर्नाटकातून सोन्या-चांदीचा मुद्देमाल लुटून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या तिघा संशयितांना विटा पोलिसांनी अक्षरशः जाळ्यात अडकवत पकडले. या कारवाईत तब्बल १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खानापूर-दुरक्षेत्रासह सांगली जिल्ह्यात या धाडसी कारवाईची जोरदार चर्चा आहे.

२० ऑगस्टच्या मध्यरात्री चिक्कमंगळूर (कर्नाटक) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा लाखो-कोटींचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्याची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात झाली असली तरी आरोपी फरारी होते.

दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना पक्की खबर मिळाली की, या चोरीतील आरोपी स्विफ्ट डिझायर (क्रमांक KA-53 AB-5466) गाडीतून विटा हद्दीतून जाणार आहेत. ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी तातडीने नाकाबंदी मोहीम हाती घेतली.

भिवघाट-विजापूर रोडवर संशयित गाडी हेरल्यानंतर पोलिसांनी थरारक पाठलाग करून वाहन थांबवले. गाडीत तीन संशयित इसम सापडले. त्यांची नावे राजेंद्र शेर बंब (४० वर्षे), एकेंद्र कटक बडपाल (३१ वर्षे), करणसिंह बहादुर धामी (३४ वर्षे) हे तिघेही धनगेडी, कैलाली जिल्हा, नेपाळ येथील रहिवासी असल्याचे समोर आले.

गाडीची तपासणी केली असता डिकीतून सोन्या-चांदीचे दागिने आढळले. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की हे सर्व दागिने कर्नाटकातील चोरीतील आहेत. पोलिसांनी मुद्देमालाची किंमत मोजली असता ती तब्बल १,५०,०३,१६५ रुपये एवढी निघाली.

या धडाकेबाज कारवाईत पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, निरीक्षक धनंजय फडतरे व सतीश शिंदे तसेच उपनिरीक्षक अभिजीत कणसे, सचिन माळी यांच्यासह पोलिस हवालदार अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, महादेव चव्हाण, अमोल नलावडे, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सागर कोकरे, गोरक्ष धुमाळ, सागर शिंदे, अभिजीत पाटील या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.

या तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी कर्नाटक राज्यातील कोप्पा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. खानापूर घाटमाथ्यावर झालेल्या या मोठ्या कारवाईनंतर विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही