ढेबेवाडी बनली गांजा-जुगार-मटक्याची बाजारपेठ ; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
ढेबेवाडी प्रतिनिधी | ढेबेवाडी परिसरात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली असून, या प्रकारांना स्थानिक पोलीस प्रशासनाचे मौन पाठबळ असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मटका, गांजा आणि बेकायदेशीर दारू विक्रीचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात असताना पोलीस यंत्रणा मात्र निष्क्रिय दिसत असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालदन येथून गांजाचा सप्लाय राजरोसपणे होत असल्याची चर्चा आहे. दुचाकींच्या माध्यमातून भालेकर वाडी, सणबुर, बनपुरी, सळवे, महिंद तसेच ढेबेवाडी स्टँड परिसरात संशयित हालचाली होत असल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या आसपासच्या भागातही अशा हालचाली दिसत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. त्यामुळे “कायद्याचा धाक उरला आहे की नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सणबुरकडे जाण्यासाठी वडाप उभे राहतात त्या परिसरात, कृष्णा मोबाईल शॉपीच्या दरम्यान मटका व जुगार क्लब सुरू असल्याचेही स्थानिक सांगतात. तसेच एसटी स्टँड परिसरात काही व्यक्ती खुलेआम गांजा सेवन करत बसत असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ढेबेवाडी परिसरात गांजा आणि मटक्याचे मोठे रॅकेट सक्रिय असून स्थानिक पोलीस यंत्रणा या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते, ठरल्याप्रमाणे ‘हप्ता’ मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचीही चर्चा आहे. जरी या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी अशा चर्चांमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणाच जर मौन बाळगून असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे.
परिस्थिती अधिक गंभीर करणारी बाब म्हणजे या व्यसनाधीनतेचा प्रभाव अल्पवयीन मुलांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. सातवी–आठवीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही या व्यसनाची सवय लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लहान वयात व्यसनाधीनता वाढत असेल तर भविष्यातील पिढीच धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.
दरम्यान, ढेबेवाडी स्टँडच्या बाजूने नवारस्ता (पाटण) कडे जाणाऱ्या रस्त्यावर, सहारा फिश दुकान व स्टेट बँकेच्या गल्लीत मटका-जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे आरोपही पुढे येत आहेत. या प्रकारांमुळे युवक वर्ग चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
याशिवाय काही धनदांडगे युवकांना हाताशी धरून त्यांच्या मार्फत गांजा तसेच गोवा बनावटीच्या दारूची विक्री राजरोसपणे सुरू असल्याचेही बोलले जात आहे. अवैध धंद्यांचे हे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असल्याची चर्चा असून त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवून बेकायदेशीर धंद्यांवर लगाम घालावा, अन्यथा जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलीस यंत्रणेची घटनात्मक जबाबदारी असून, आता तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न ढेबेवाडी परिसरात विचारला जात आहे.