राजकीयविदर्भ

निवडणुकीची वारी, सरसावले कारभारी

इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठींवर जोर, ‘नमस्कार-रामराम’ मोहीम सुरू

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर तालुक्यात पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीची चाहूल लागली असून गावोगावी राजकारणाचा पारा तापू लागला आहे. अजून कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी आधीच ‘मैदान गरम’ केले आहे. कडक इस्त्रीचा शर्ट, चेहऱ्यावर कृत्रिम हास्य, हातात ‘रामराम’ आणि ओठांवर ‘नमस्कार’ असा सगळा माजरा सध्या गावोगावी दिसतोय.

“भाऊ दादा परवा दिसले भेटले म्हणजे निवडणुका येतायत बरं” अशी मिश्कील कुजबुज मतदारांमध्ये सुरु आहे. चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच स्तरावर इच्छुकांची भाऊगर्दी सुरू आहे.

गावोगावी आता “मीच खरा जनसेवक” अशी टोलवाटोलवी सुरू झाली आहे. कुणी आरोग्य शिबीर घेतंय, कुणी मदत वाटतोय, तर कुणी सोशल मीडियावर पोस्ट झाडून ‘सेवा’ दाखवतोय. उमेदवारी मिळो अथवा न मिळो, शक्तिप्रदर्शनात कुणीही मागे नाही.

एकेकाळी हसणं-बोलणं असलेले मित्र आता वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहेत. घराघरात पुन्हा राजकारण शिरलं आहे. “फाईट जबरदस्त, वातावरण टाईट” असं दृश्य प्रत्येक गावात दिसतंय.

राजकीय पक्षांनीसुद्धा या निवडणुकांना प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला असून, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. कोणाचे तिकीट कट होणार, कोण उभा राहणार, कोण बसणार या चर्चांनी गावगाडा गजबजला आहे.

एकूणच मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येक गल्लीबोळात आता निवडणुकीची चाहूल स्पष्ट जाणवतेय. नेत्यांच्या भेटीगाठींनी सार गाव पेटलंय आणि मतदार म्हणतोय. “आले रे आले, पुन्हा एकदा कारभारी आले.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही