पाटण पुरवठा विभागातील कारभाराबाबत महेंद्र चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | पाटण तहसिलदार कार्यालयातील पुरवठा विभागातील अनागोंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत पाटण तालुका अपंग संघटनेचे अध्यक्ष महेंद्र तुकाराम चव्हाण यांनी आज पासून पाटण तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पाटण प्रशासनाकडे रीतसर माहिती व मागण्या सादर करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुरवठा विभागातील काही अधिकारी व मुदत संपलेले अंशकालीन कर्मचारी अहंभावाने वागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान चव्हाण यांनी पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत.
पुरवठा शाखेतील माहिती अधिकाराखाली मागील सहा महिन्यांतील रास्त भाव दुकानदारनिहाय धान्यवाटपाची योजना व आकडेवारी (गहू, तांदूळ व इतर धान्य) जाहीर करावी.
माहे जानेवारी २०२६ मधील रास्त भाव दुकानदारनिहाय धान्यवाटपाची सविस्तर आकडेवारी उपलब्ध करून द्यावी.
पुरवठा शाखेतील मुदत संपलेले अंशकालीन कर्मचारी तात्काळ सेवामुक्त करावेत.
पुरवठा शाखा स्वतंत्र असताना गेली चार वर्षांहून अधिक काळ महसूल विभागातील तारळे येथे गोडाऊन किपर म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याऐवजी त्या ठिकाणी पुरवठा विभागाचाच अधिकारी नेमावा.
या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पारदर्शकता राखावी, अशी मागणी मा.महेंद्र चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत पाटण तहसिल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महेंद्र चव्हाण यांनी पुरवठा विभागाच्या कारभाराविरोधात सुरू केलेल्या अमरण उपोषणाच्या आजच्या पहिल्याच दिवशीच तालुक्यातील अनेक नागरिकांनी तसेच विविध सामाजिक संघटना, व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.