कर्नाटककोकणजागतिकनिवडणूक रणघुमाळमराठवाडामहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्यम्हसळा तालुकाराजकारणराजकीयरायगडविदर्भ

तिकिटांच्या डावात रंगले नेते ; वाऱ्यावर पडले निष्ठावंत कार्यकर्ते

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना राजकारणातील एक कटू वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे. एखाद्या नेत्याला पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, की तो क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. कालपर्यंत ज्या पक्षासाठी छातीठोक भाषणं, आंदोलने आणि घोषणाबाजी केली, तोच पक्ष एका झटक्यात परका ठरतो. मात्र, याच राजकारणात पक्षासाठी आयुष्य खर्ची घालणारा सच्चा कार्यकर्ता मात्र आजही त्या पक्षात निष्ठेने उभा आहे.

हा कार्यकर्ता उन्हातान्हात फिरतो, झेंडे उचलतो, सभा-मेळाव्यांची जबाबदारी घेतो, पक्षश्रेष्ठींसाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करतो. पण निवडणुकीचा काळ आला की उमेदवारीच्या चर्चेत त्याचं नाव कुठेच नसतं. नेत्यांना मात्र, पक्ष बदलण्याचा ‘पर्याय’ खुला असतो. कार्यकर्त्यांसाठी मात्र तोच पक्ष आयुष्यभराचा ठरतो. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो असा निष्ठावान कार्यकर्ता कधी नेता होणार आहे? की नेता थेट आपल्या मुलालाच पुढे करून, घराणेशाहीच्या जोरावर तिकीट मिळवून देण्याचीच परंपरा कायम राहणार?

आज कार्यकर्त्याची भूमिका केवळ पोस्टर लावणं, सतरंज्या टाकणं,-उचलणं, खुर्च्या मांडणं, नेत्यांच्या पुढे-मागे फिरणं इतपतच मर्यादित राहिली आहे. निवडणूक संपली की तोच कार्यकर्ता पुन्हा विसरला जातो. निर्णयप्रक्रियेत त्याला स्थान नसतं, पक्षसंघटनेत त्याचं मत विचारात घेतलं जात नाही. अशा परिस्थितीत कार्यकर्त्याचं भवितव्य तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो.

राजकारण हे जनतेसाठी, समाजासाठी असायला हवं होतं मात्र, सध्याच्या परिस्थितीत ते अनेक ठिकाणी वैयक्तिक सोयीसाठी खेळलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. तळागाळात राबणारा कार्यकर्ता आजही गाळातच अडकून पडलेला आहे तर वरच्या पातळीवर बसलेले नेते मात्र, सतत सुरक्षित राजकारण करताना दिसतात.

आपल्या वार्डात, विभागात किंवा गावात ठोस काम नसतानाही केवळ ‘सेटिंग’च्या जोरावर पुढे येणाऱ्यालाच नेता मानायचं का ? असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे व्यक्त होऊ लागली असून, राजकीय वर्तुळात त्याची दखल घेणं अपरिहार्य ठरत आहे.

आता तरी पक्षाच्या वरच्या फळीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरोखर पक्षासाठी कोण झिजतो? कोण काम करतो? याची प्रामाणिक चाचपणी व्हायला हवी. निष्ठावान कार्यकर्त्याला केवळ पोस्टरपुरतं मर्यादित न ठेवता, त्यालाच उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

नाहीतर एक दिवस कार्यकर्ता थेट प्रश्न विचारेल “आम्ही फक्त वापरून फेकायचेच आहोत का?” आणि तो प्रश्न केवळ पक्षांसाठीच नव्हे, तर संपूर्ण राजकारणासाठी घातक ठरू शकतो.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही