कलाविदर्भशैक्षणिक

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सुयश ; कु. वैष्णवी गोरख हिने अमरावती विद्यापीठात पटकावली दुसरी मेरिट

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

श्री. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा संचालित येथील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाची बी.एससी. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी सुधीर गोरख हिने शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दुसरी मेरिट मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या उन्हाळी परीक्षेत कु. वैष्णवीने गणित, भौतिकशास्त्र आणि संगणकशास्त्र या विषयांत उल्लेखनीय कामगिरी करत ३३५० पैकी ३००१ गुण प्राप्त केले. तिला ९.३४ असा उत्कृष्ट एस.जी.पी.ए. मिळाला असून या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक उज्ज्वल अध्याय जोडला गेला आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांचे सातत्याने नाव झळकण्याची परंपरा वैष्णवीने कायम राखली असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

या यशाबद्दल श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळाचे अध्यक्ष माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, संस्थेचे सचिव चंद्रकांत ठाकरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे, संबंधित विषयांचे प्राध्यापक तसेच कला व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी कु. वैष्णवीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या यशाविषयी भावना व्यक्त करताना कु. वैष्णवी म्हणाली की, कठोर मेहनतीसोबतच आई-वडिलांचे सहकार्य व सततचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. हे यश केवळ माझे नसून संस्थेने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सोयी-सुविधा, महाविद्यालय प्रशासनाचे सहकार्य आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे, असे तिने नमूद केले.

तिने विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक डॉ. संजीव इंगळे यांच्यासह गणित, भौतिकशास्त्र व संगणकशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. किशोर वानखडे, डॉ. चंद्रकांत उल्हे, प्रा. महेश मनवर, प्रा. अश्विन कदम, प्रा. अजय राठोड, प्रा. मोहम्मद मुजम्मिल तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आपण हे यश संपादन करू शकलो, असेही ती म्हणाली.

कु. वैष्णवीच्या या उज्ज्वल यशामुळे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही