उबाठा गटाचा बोगस पक्षप्रवेश ; शिंदे गटाचा जोरदार निषेध

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
राजकीय रंगमंचावर आरोप-प्रत्यारोपाची चढाओढ सुरू असतानाच, उबाठा गटावर आता बोगस पक्षप्रवेशाचा गंभीर आरोप झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख किरणसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषद घेत उबाठा गटाचा हा “नवा खेळ” उघड केला आहे.
राजपूत म्हणाले की, उबाठा गटाने फरा सय्यद व स्नेहल माळी या दोन कार्यकर्त्यांचा बोगस पक्षप्रवेश दाखवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात या कार्यकर्त्या कधीच शिंदे गटात नव्हत्या. जिल्ह्यातील अनेकांनी त्यांना उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या गाडीत फिरताना पाहिले आहे. मग अशा कार्यकर्त्यांना प्रवेश दाखवून काय साध्य होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फक्त एवढेच नव्हे, तर उबाठा गटाच्या जुन्या कृत्यांचीही त्यांनी आठवण करून दिली. दोन वर्षांपूर्वीही या गटाने बोगस सभासद नोंदणी करून फसवणूक केली होती. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. योग्य वेळी हे पुरावे आम्ही सार्वजनिक करू. खोटी कागदपत्रे, बोगस सभासद आणि फसवेगिरी हाच उबाठा गटाचा इतिहास आहे, असा गंभीर आरोप राजपूत यांनी केला.
त्यांनी पुढे इशारा देत म्हटले की, जर कोणी आमच्या शिवसेनेला ‘मिंदे गट’ म्हणाले, तर आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आम्ही कोणाच्या पाया पडून पद मिळवले नाही. कामाच्या जोरावर मी मिरज शहर प्रमुख झालो आहे. तुमचं जेवढं पदाधिकारी आहेत, तेवढीच तुमची शिवसेना आहे. खरी ताकद ही कार्यकर्त्यांतून येते, आणि ती ताकद आमच्याकडे आहे. खरी शिवसेना ही आमचीच आहे, असा ठाम दावा त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला गजानन मोरे, कोमल कवटेकर, सचिन अलकुंटे, मुस्तकीम अत्तर, अमन सय्यद, यश पाटील, प्रेम देसाई, ओंकारसिंग राजपूत आणि साहिल मोकाशे हे कार्यकर्ते उपस्थित होते.