“दहशतीसाठी रिल्स शूट करताना अल्पवयीन तलवारीसह पोलिसांच्या जाळ्यात”

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | सोशल मीडियावर “दहशत माजविण्याच्या” हेतूने रिल्स तयार करण्यासाठी बेकायदा घातक हत्यार म्हणजेच तलवार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन बालकास महात्मा गांधीचौक पोलीस ठाणे, मिरज पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे २०० रुपयांची किंमत असलेली एक तलवार जप्त केली आहे.
दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी मिरज रेल्वे स्टेशनजवळील पिंपळाच्या झाडाखाली तलवार घेऊन थांबलेल्या अल्पवयीनाबाबत पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना गोपनीय माहिती मिळाली. सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने तत्काळ छापा टाकला. पोलिसांना पाहताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.
चौकशीत त्याने कबुली दिली की, तो “दहशत दाखवणारे” रिल्स सोशल मीडियावर टाकण्यासाठी तलवार घेऊन आला होता. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, व उपविभागीय अधिकारी श्री. प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे करीत आहेत.
महात्मा गांधीचौक पोलिसांनी अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या “गुन्हेगारी रिल्स” संस्कृतीवर लगाम लावत समाजाला जागरूकतेचा संदेश दिला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारचे अवैध शस्त्र बाळगणे किंवा त्यास प्रोत्साहन देणारी कृती दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.