दहावीचा इंग्रजी पेपर फुटला ; बीड-लातूरमध्ये शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा ; CCTV बंद, कॉपीला रान मोकळं

LiVE NEWS | UPDATE
बीड | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
बीड/लातूर | दहावीच्या इंग्रजी पेपरच्या दिवशीच शिक्षण व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. बीड जिल्ह्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधीच इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं एका शिक्षकाच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. सेट झेरॉक्स काढण्यासाठी दोन प्रश्नांची उत्तरं पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. इतकंच नव्हे तर काही काळ लाईट बंद करून CCTV फुटेजही बंद ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
दुसरीकडे लातूर तालुक्यातील जोडजवळा येथील समता विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर तर नियमांना अक्षरशः हरताळ फासण्यात आला आहे. बोर्डाने कॉपी रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवणे आणि चित्रीकरण जतन करणे बंधनकारक केले असतानाही येथे एकही CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे ही संस्था राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याशी संबंधित असून ते संस्थेचे सचिव आहेत. मग बोर्डाचे नियम कोणासाठी? सामान्य केंद्रांसाठी आणि ‘प्रभावशाली’ केंद्रांसाठी वेगळे कायदे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कॉपीमुक्त परीक्षा राबवण्याचे आदेश देत प्रत्येक वर्गावर झूम मीटिंगद्वारे लक्ष ठेवले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र परळी येथे सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत कॉपी देणाऱ्यांचा सुळसुळाट दिसत आहे. पोलिस बंदोबस्त असूनही कॉपीबहाद्दरांना कुणाची भीती उरलेली नाही.