पाच वर्षे वॉर्डात नाही, आता मतांसाठी धावाधाव ; आश्वासनांची भरमार, कामांचा दुष्काळ

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच सांगली–मिरज–कुपवाड शहरात पुन्हा एकदा राजकीय ढोंगनाट्याला सुरुवात झाली आहे. पाच वर्षे वॉर्डाकडे पाठ फिरवणारे, जनतेच्या दुःखाशी कधीच न जोडले गेलेले नगरसेवक अचानक अवतरले आहेत. हातात नम्रतेचा मुखवटा, तोंडात विकासाची भाषा आणि मनात फक्त सत्तेची लालसा असा हा सगळा प्रकार पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. पाच वर्षे कुठे होता? हा प्रश्न आता प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात आणि प्रत्येक घरात विचारला जात आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची रोजची फरफट, रस्त्यांवर पडलेली खड्ड्यांची चाळण, उघडी गटारे, सांडपाण्याचा दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग, अपुऱ्या आरोग्य सुविधा, अस्वच्छता आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी हीच सांगली-मिरज-कुपवाडमधील वास्तवाची ओळख बनली आहे. विकासाचे फलक लावले गेले, पण प्रत्यक्ष विकास मात्र कधीच दिसला नाही. पाच वर्षे काम शून्य आणि आश्वासन मात्र अमर्याद, अशीच अवस्था प्रत्येक वॉर्डात दिसून येते.
निधी मंजूर झाले, प्रस्ताव पास झाले, बैठकांचे फोटो सोशल मीडियावर झळकले पण जमिनीवर काम कधी उतरलेच नाही. अर्धवट रस्ते तसेच सोडून देण्यात आले, गटारे महिनोन्महिने उघडी ठेवली गेली, कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले. पाण्यासाठी नागरिकांना टँकरमागे धावावे लागले, पण नगरसेवक मात्र एसी कार्यालयात बसून विकासाच्या गप्पा मारत राहिले. हीच का लोकप्रतिनिधींची जबाबदारी, असा सवाल आज नागरिक विचारत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे काही नगरसेवक पाच वर्षांत एकदाही आपल्या वॉर्डात फिरकले नाहीत. नागरिकांच्या तक्रारी, निवेदने, मोर्चे आणि आंदोलनांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली. फोन उचलले गेले नाहीत, कार्यालयाचे दरवाजे बंद राहिले. मात्र, आज तेच नगरसेवक हात जोडून, नम्रतेचा आव आणत मत मागताना दिसत आहेत. ही लोकशाही आहे की जनतेची उघड फसवणूक, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
निवडणूक जवळ येताच पुन्हा एकदा यावेळी मोठा विकास, भरीव निधी आणणार, वॉर्डाचा कायापालट अशी पोकळ भाषणे सुरू झाली आहेत. पण गेल्या पाच वर्षांत जे झाले नाही, ते अचानक कसे होणार, हा प्रश्न आज जनतेला पडला आहे. आश्वासनांचे शब्द गोड असले तरी अनुभव मात्र कडूच राहिला आहे.
“आश्वासन भारी, काम शून्य” हे समीकरण आता सांगली–मिरज–कुपवाडमधील जनतेच्या पक्के लक्षात आले आहे. यावेळी फक्त बोलघेवड्यांना नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांनाच संधी द्यायची, असा ठाम आणि आक्रमक सूर प्रत्येक वॉर्डातून उमटत आहे. मतदार यावेळी गप्प बसणार की मतपेटीतूनच पाच वर्षांच्या निष्क्रियतेचा हिशेब चुकता करणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.