नववर्षाच्या स्वागताला काव्याचा जागर ; आळेफाट्यात भव्य कवी संमेलन उत्साहात संपन्न

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
प्रतिनिधी | राहुल कडलाक
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साहित्यप्रेमींना काव्याची पर्वणी लाभली. खरमा साहित्य संघ व कला साहित्य विचार मंच, आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कवी संमेलन उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. नववर्षाची सुरुवात काव्यरूपी व्हावी, कवींना प्रेरणा व नवचैतन्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करत करण्यात आली. या कवी संमेलनाचे अध्यक्षपद राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. खरमाळवे यांनी भूषविले. उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक आप्पा वाव्हळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आळे गावचे सरपंच सखाराम भंडलकर, माजी सरपंच विजय कुऱ्हाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) नेते संभाजी साळवे, पोपट राक्षे, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या संचालिका प्रियांका शेळके, कलावंत संघटनेचे अध्यक्ष गवनेर सरोदे, सरपंच महेश शेळके, शंकर गोफणे, समाजसेवक राजेंद्र आल्हाट, सम्राट साहित्य मंच पुणेचे विनोद अष्टुळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या संमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी डॉ. संजय बोरुडे यांनी सादर केलेल्या “तर खरंच सांगत होतो ज्योतिबा” या कवितेने रसिकांचे मन जिंकले. कवी सुभाष सोनवणे यांनी अभंगाच्या अमृतवाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सम्राट साहित्य मंच पुणेचे प्रमुख यांनी आपल्या धारदार शब्दांनी सामाजिक वास्तवावर नेमके प्रहार केले.
कविता सादरीकरणात संतोष गाढवे, नवनाथ सरोदे, दत्ता सुकाळे, शब्दस्वरा मंगळूरकर, अशोक उघडे, अलका जोगदंड, बाळासाहेब ताजवे, संदीप ताजवे, जदेव्रत आखाडे, रुपचंद शिदोरे, प्रा. साळवे, शाहिर शिवाजी थिटे, गोकुळ गायकवाड, नितीन शेलार, शांताराम देठे, अल्पेश सोनवणे यांनी प्रभावी कविता सादर केल्या. तसेच संजना आभाळे, सरिता शिंदे, प्रियंका घुंबरे, समीक्षा दिघे या नवोदित कवयित्रींनीही आपल्या काव्यरचनांनी रसिकांची दाद मिळवली.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये पत्रकार सुदर्शन मंडले, माजी पोलिस पाटील बाळासाहेब कदम, रिपाइंचे सुरेश खरात व सोमनाथ शिंदे, बन्सी त्रिभुवन, सनईवादक किसन खरात, गौतम शिंदे, भारतीय बौद्ध महासभेचे अरविंद पंडित, पो.नि. रामचंद्र कुटे, दत्ताराम कुटे, लक्ष्य पोलिस भरती आळेफाटा प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख निलेश रायकर सर, शिवनेरी न्यूजचे संपादक राहुल कडलाक, उद्योजक अनिल भुजबळ, उद्योजक सिद्धार्थ वाव्हळ, संदीप शितोळे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक पोपट सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन कवी संतोष गाढवे व विनोद अष्टुळ यांनी तर आभारप्रदर्शन अध्यक्ष डॉ. खरमाळवे यांनी केले. काव्य, विचार आणि नववर्षाच्या आशयपूर्ण स्वागताने हे कवी संमेलन आळेफाट्याच्या सांस्कृतिक जीवनात एक संस्मरणीय ठसा उमटवून गेले.