नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गावरून रणकंदन; शेतकरी पेटले, मिरजमध्ये तुफान निदर्शने
गोळ्या घातल्या तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही ; शेतकरी आक्रमक

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली आज मिरज येथिल प्रांताधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. “छातीवर गोळ्या झेलू, पण जमिनी देणार नाही,” असा आक्रमक इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू असून शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाची दखल न घेता पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने मोजण्या करण्यात येत आहेत. गेल्या दीड वर्षात शेतकरी विविध आंदोलने करत असून अनेकदा हरकती, निवेदने दिली तरीही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
आजच्या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेत स्थानिक शेतकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी मागणी केली की, महामार्गासाठी होणाऱ्या मोजण्या तात्काळ थांबवाव्यात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचे प्रयत्न थांबवावेत.
शेतकऱ्यांनी सवाल केला की, रत्नागिरी-नागपूर महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता काय? हे प्रकल्प कोणासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी आहेत, याचा पुनर्विचार सरकारने करावा. “हा महामार्ग अदानी समूहासारख्या खाजगी कंपन्यांच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आहे का?” असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला.
“फासावर चढू, गोळ्या झेलू, पण जमीन देणार नाही,” असा इशारा देत शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आगामी काळात राज्यभर पेटण्याची शक्यता आहे.