नागरिकांनी शांततामय व पर्यावरणपूरक होळी साजरी करावी ; ठाणेदार किशोर शेळके

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
सोमवारी, दि. २ मार्च २०२६ रोजी होळी तर दि. ३ मार्च रोजी रंगपंचमी साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शांततामय वातावरणात व पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन मंगरुळपीर येथील ठाणेदार किशोर शेळके यांनी केले आहे.
होळी हा आनंद, उत्साह आणि एकोप्याचा सण असला तरी तो साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. होळीसाठी झाडे तोडू नयेत. रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे तसेच पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. तसेच प्राण्यांवर रंग टाकणे किंवा त्यांना त्रास देणे टाळावे. पाण्याचा अपव्यय न करता ‘कोरडी होळी’ साजरी करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक
मंगरुळपीर तालुक्यातील नागरिकांनी होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि रासायनिक रंगांचा वापर टाळावा. धुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंगांचा वापर होतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करणे टाळावे. तसेच रंगांचे फुगे डोळ्यांवर लागल्यास इजा होऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी
होळी व रंगपंचमी साजरी करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, शेणाच्या गोवऱ्या जाळून होळी साजरी केली जाते. यामुळे वृक्षतोड व वायुप्रदूषण वाढते. पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये यासाठी संयमाने व साध्या पद्धतीने सण साजरा करावा.
पर्यावरणपूरक होळी साजरी करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी पार पाडूया, असे आवाहन ठाणेदार किशोर शेळके यांनी नागरिकांना केले आहे.