राजकीय डावपेचाचा संशय ; आ. इंद्रिस नाईकवाडी यांच्या उद्घाटन फलकाची तोडफोड

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव येथील सोमेश्वर मंदिर परिसरात मंजूर झालेल्या विकासकामाच्या डिजिटल उद्घाटन फलकाची अज्ञातांकडून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, या प्रकारामुळे संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेचा जाहीर निषेध ग्रामस्थांकडून होत असून, दोषींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.
विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नाईकवाडी यांच्या स्थानिक विकास निधीतून खटाव गावातील सोमेश्वर मंदिर परिसरात काँक्रीटीकरण रस्ता तसेच पाणी निचरा, बाजूला पेव्हर ब्लॉक, संरक्षण भिंत आदी मूलभूत सोयीसुविधांसाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामाचे उद्घाटन दोन महिन्यांपूर्वी आमदार इंद्रिस नाईकवाडी व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते मोठ्या उपस्थितीत पार पडले होते.
या कामाचा अधिकृत डिजिटल माहिती फलक ग्रामस्थांच्या माहितीसाठी लावण्यात आला होता. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञातांनी हा फलक तोडून जमिनीवर पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, हा प्रकार केवळ तोडफोडीपुरता मर्यादित नसून विकासकामांवर अडथळे निर्माण करण्याचा कट असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली असून, दोषींना त्वरित अटक करून कठोरतम कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात येत आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
या घटनेमुळे विकासकामाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
ही घटना केवळ फलक तोडण्यापुरती मर्यादित नसून, ती लोकशाही मूल्यांवरचा हल्ला असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये पक्की झाली आहे. संपूर्ण मिरज तालुक्यात या प्रकरणाची चर्चा जोर धरत असून, आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.