नेत्याच्या सोशल मीडिया पोस्टची सर्वत्रच चर्चा ; मिरजेत कमळच ! मिरज विधानसभा मतदारसंघात ठरला भाजपचा उमेदवार?

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीत कामाला लागलेत. सत्ताधारीसह विरोधी पक्ष उमेदवारांची नावे निश्चित करण्यात गुंतले आहेत. भाजपकडून अद्याप ही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरुच आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात नेत्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत आहे.

मिरज मतदारसंघाचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोशल मीडिया फेसबुकवर “मिरजेत कमळच!” अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे येथून त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याचे संकेत मिळत आहेत. खाडे यांना यावेळी उमेदवारी मिळाल्यास त्यांना सलग पाचव्यांदा उमेदवारी मिळणार आहे. दरम्यान, भाजपची पहिली यादी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरेश खाडे यांनी उमेदवारी एक प्रकारे जाहीर केली आहे का? अशीही चर्चा आहे. सुरेश खाडे गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध खात्यांचा कारभार पाहिला आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक न्याय मंत्री होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिरजमध्ये सुरेश खाडे 96 हजार 369 मते मिळवून विजयी झाले होते. येथे समाजवादी कामगार पक्षाचे बाळासो दत्तात्रय हनमोरे हे 65971 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. तर वंचित बहुजन आघाडीचे नानासो सदाशिव वाघमारे हे 8902 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, 2014च्या निवडणुकीत देखील 93 हजार 795 मते मिळवून खाडे विजयी झाले होते.आता मिरजेत कमळच या पोस्ट ची मोठी चर्चा होत आहे.