वाशिमला ओला दुष्काळ जाहीर करा ; शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा ; सुभाषराव ठाकरे
शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर | संपूर्ण वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे, अशी ठाम मागणी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केली आहे.
या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगरुळपीर तहसील कार्यालयावर काढण्यात आला. तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करण्यात आली.
गेल्या जून महिन्यापासून वाशिम जिल्ह्यात ढगफुटीसदृश अतिवृष्टी सुरू आहे. १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यात तब्बल ८३८ मिमी पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षीची सरासरी पावसाची मात्रा ७२५ मिमी असताना यंदा ११३ मिमी पावसाचा जादा मारा झाला आहे. या अतिवृष्टीमुळे नद्या ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील शेतजमिनी तुडुंब भरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला असून, त्याला उभारी देण्यासाठी सरकारने तातडीने एकरी आर्थिक मदत द्यावी, असा ठराविक सूर मोर्चातून उमटला. शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करून त्यांना दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.