
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान वाशिम जिल्ह्यातील केंद्र क्रमांक ०९०६, श्री मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, टो-जुमडाफाटा येथे सामूहिक कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून कॉपीमुक्तीच्या दाव्यांचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. भरारी पथकाच्या अचानक धाडीत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी शब्दशः एकसारखी उत्तरे लिहिल्याचे आढळून आल्याने शिक्षण व्यवस्थेतील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता भरारी पथकाने केंद्राची आकस्मिक तपासणी केली. नोंदणीकृत ५८४ विद्यार्थ्यांपैकी ५८१ विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा केंद्रात दाटीवाटीची आसनव्यवस्था, टिनशेडमध्ये परीक्षा, अपुरी प्रकाशयोजना, पंखे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मर्यादित संख्या, तसेच वीज खंडित झाल्यास पर्यायी जनरेटरची सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण केंद्रात केवळ आठ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.
उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी करताना बहुसंख्य विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः समान असल्याचे स्पष्ट झाले. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन अथवा पेन्सिलने पूर्वखूणा केल्याचेही आढळले. यामुळे सामूहिक कॉपीचे ठोस संकेत मिळाल्याचे पथकाने नमूद केले आहे. दरम्यान, अर्पित चौहान यांनीही केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोनसह परीक्षा केंद्रात फिरताना आढळला. मोबाईल तपासणीस टाळाटाळ केल्यानंतर दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून ते पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. बैठ्या पथकाच्या प्राथमिक अहवालात ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
भरारी पथकाचा सविस्तर अहवाल, उत्तरपत्रिकांची तुलना, सीसीटीव्ही फुटेज, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि कर्मचाऱ्याकडील मोबाईल या सर्व बाबींच्या आधारे केंद्र क्रमांक ०९०६ येथे गंभीर अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणी जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन, विभागीय चौकशी व फौजदारी कारवाईचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती दिली आहे.