मराठवाडा

पाझर तलाव बुजवणारे दाजीच ‘साक्षीदार’ ; अभियंता शेलारांचा चौकशी अहवाल ठरला चमत्कार

लातूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

निलंगा प्रतिनिधी | लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे शिऊर येथील शासकीय गायरान जमिनीवरील पाझर तलाव प्रकरणात प्रशासनाच्या चौकशीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ज्या व्यक्तीवर तलाव बुजवून अतिक्रमण केल्याचा आरोप आहे, त्याच व्यक्तीला चौकशी अहवालात साक्षीदार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा चौकशी अहवाल निष्पक्ष आहे की संगनमताचा नमुना, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

मौजे शिऊर येथील सर्वे क्रमांक १ मधील सुमारे ३ एकर क्षेत्रफळाचा पाझर तलाव तसेच त्यास लागून असलेली ५ ते ६ एकर गायरान जमीन ही गावातील शेतकरी आणि जनावरांसाठी महत्त्वाचा पाणीसाठा आहे. या तलावामुळे परिसरातील शेतीला पाणी मिळते, जनावरांची तहान भागते आणि भूजल पातळी टिकून राहते. मात्र गावातील दाजी नावाच्या व्यक्तीने हजारो ब्रास खडक व मुरूम विनारॉयल्टी काढून तोच मुरूम तलावात टाकत पाझर तलाव बुजवण्याचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ठिकाणी गुळ उद्योग उभारण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

या संदर्भात तक्रार करण्यात आल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाकडून चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीच्या प्रक्रियेतच धक्कादायक घडामोड झाली. कनिष्ठ अभियंता ए.बी. पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याचा अहवाल दिला; पण ज्यांच्यावर तलाव बुजवण्याचा आरोप आहे त्या दाजी यांनाच चौकशीचा साक्षीदार बनवण्यात आले. शिऊर गावाची लोकसंख्या हजारोंमध्ये असताना इतर कोणत्याही ग्रामस्थाची साक्ष न घेता आरोपीचीच साक्ष घेण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे चौकशी अहवालातच विरोधाभास दिसून येतो. कनिष्ठ अभियंता म्हणतात की घटनास्थळी मुरूम दिसून आला नाही. मात्र साक्षीदार असलेले दाजी सांगतात की वळसांगवी ग्रामपंचायतीने रस्त्यासाठी मुरूम टाकला आहे. अधिकारी एक सांगतात आणि साक्षीदार दुसरेच सांगतात, त्यामुळे या चौकशीची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे निलंगा यांच्या अहवालाच्या आधारे कार्यकारी अभियंता बी.आर. शेलार (जिल्हा परिषद, लातूर) यांनी ६ मार्च २०२६ रोजी दिलेल्या अहवालात शिऊर येथील पाझर तलाव हा लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र नियमांनुसार ० ते १०० हेक्टर क्षेत्रफळातील तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात, तसेच शिवकालीन तलावांची जबाबदारीही जिल्हा परिषदेकडे असते. असे असताना तलाव आमच्या ताब्यात नाही, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाल्याची टीका होत आहे.

या प्रकरणामुळे आता एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. लघु पाटबंधारे विभाग म्हणतो तलाव आमचा नाही, जलसंधारण विभाग म्हणतो आमचा नाही, जलसंपदा विभाग नाकारतो आणि महसूल विभागही हात झटकतो; मग शिऊर गावातील हा पाझर तलाव नेमका कोणाच्या ताब्यात आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कनिष्ठ अभियंता ए.बी. पाटील, उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता बी.आर. शेलार यांनी संगनमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून खोटा अहवाल दिला आणि तलाव बुजवण्याच्या प्रकाराला संरक्षण दिले. त्यामुळे या प्रकरणात तलाव बुजवणाऱ्यांवर तसेच खोटा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने ६ एप्रिल २०२६ पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही