पाटणचा उरुस ठरला राष्ट्रीय एकात्मतेचा दीपस्तंभ ; बंधुतेचा संदेश देत सामाजिक सलोख्याचा एल्गार

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे
पाटण | जात, धर्म, पंथ, पोटभेद यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला पाटणचा उरुस सोहळा सामाजिक ऐक्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जाज्वल्य आदर्श ठरला आहे. रामापूर, पाटण येथे पुणेवाले यांच्या उरुसानिमित्त आयोजित सामाजिक कार्यक्रमाने सर्वधर्मसमभाव, बंधुता आणि सामाजिक दायित्व यांचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. धार्मिक सोहळ्याला सामाजिक भानाची जोड देत एमके ३१ सोशल फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी एकमुखाने सांगितले की, समाजमनातील सलोखा आणि परस्पर विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे.
रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी आपल्या भाषणात ठामपणे प्रतिपादन केले की, हिंदू-मुस्लिम ऐक्य केवळ घोषणांमध्ये नव्हे तर कृतीत उतरले पाहिजे. पाटणचा उरुस हा माणुसकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सर्व जातीधर्माचे लोक एका छताखाली एकत्र येऊन सामाजिक कार्य करीत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जगात जन्माला येताना आपण केवळ एक व्यक्ती म्हणून येतो; धर्म, जात, नाव ही नंतरची ओळख असते. कर्म श्रेष्ठ असेल तर फळही श्रेष्ठ मिळते. माणसे जोडणारा माणूसच खऱ्या अर्थाने सर्वांत श्रीमंत असतो.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सामाजिक ऐक्य, परस्पर सहअस्तित्व आणि बंधुभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले. पुणे महानगरपालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, जगात अनेक जण यशस्वी होतात; परंतु आपल्या मातीत आणि माणसांत नाळ जपणारे मोजकेच असतात. पुण्यात स्थायिक असूनही चिश्तींचे कार्य आपल्या मूळ गावाशी निष्ठा राखणारे आहे. लोकांच्या वेदनेवर ‘दवा’ देत ‘दुवा’ मिळवण्याचे त्यांचे कार्य गौरवास्पद आहे. त्यांनी मन:शांती आणि सामाजिक सलोखा यांना आधुनिक जीवनातील सर्वात मोठी गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. सामाजिक समन्वय, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक संवाद प्रस्थापित करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या म्हासुर्णेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरख नारकर यांनी केले.