मतदानकार्ड नसले तरी हरकत नाही ; १२ ओळखपत्रांवरही मिळणार मतदानाचा हक्क ; मतदान केंद्रात मोबाईलला सक्त मनाई

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
येऊ घातलेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसले तरी चिंता करण्याचे कारण नाही. आयोगाने निश्चित केलेल्या १२ पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र दाखवल्यास मतदारांना व्यवस्थित मतदान करता येणार आहे, अशी माहिती बारामती विधानसभा निवडणूक अधिकारी यांनी दिली.
या पर्यायी पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, बँक/टपाल बचत पासबुक, श्रम मंत्रालयाचा आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन कागदपत्रे, सरकारी/अर्ध-सरकारी/पीएसयू कर्मचार्यांची ओळखपत्रे, खासदार-आमदारांना दिलेले ओळखपत्र तसेच दिव्यांग व्यक्तींचे विशेष ओळखपत्र यांचा समावेश आहे.
मतदान केंद्रात शांतता, शिस्त आणि गोपनीयता राखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतदानाचे चित्रीकरण किंवा छायांकन करणे हा निवडणूक विषयक गंभीर गुन्हा असून त्यासाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार दंडनीय कारवाई होऊ शकते. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरातही मोबाईल बाळगण्यास बंदी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मतदारांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, कोणताही अनुचित प्रकार टाळावा, मतदानाची गोपनीयता अबाधित ठेवावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून यंदाच्या निवडणुकीतही मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.