कलाविदर्भशैक्षणिक

पाटी-पेन्सिल संपल्या ; अक्षरांच्या रेषा विस्कटल्या

वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

काळ बदलला, तंत्रज्ञान आलं. पण या बदलांसोबत शाळेतलं सुंदर हस्ताक्षर मात्र झपाट्याने हरवत चाललं आहे. कधी काळी विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याची, शिक्षणाची पहिली ओळख असलेली पाटी-पेन्सिल आज शालेय शिक्षणातून जवळपास हद्दपार झाली आहे. त्याचबरोबर वळणदार, टपोरे आणि सुंदर अक्षरांची संस्कृतीही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्वी शाळेत पाऊल टाकताच हातात पाटी आणि पेन्सिल असायची. अंक, मुळाक्षरे, बाराखडी यांचा पहिला प्रवास मातीच्या किंवा पत्र्याच्या पाटीवरच व्हायचा. पाटीवर लिहायचं, पुसायचं आणि पुन्हा नीट लिहायचं या प्रक्रियेतूनच अक्षरांची बैठक, हाताची हालचाल आणि लेखनाची शिस्त निर्माण व्हायची. आज मात्र पहिलीपासूनच थेट वही–पेन आणि त्याहून पुढे टॅबलेट, मोबाईल आणि स्मार्ट बोर्डपर्यंत उडी घेतली जात आहे.

डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली पारंपरिक पाटी-पेन्सिलला बाजूला सारण्यात आलं आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर दिसून येत आहे. वळणदार, सुबक लिखाणाची जागा आता विस्कळीत, घाईघाईने लिहिलेल्या अक्षरांनी घेतली आहे. अक्षर ओळखण्याचा नैसर्गिक प्रवास तुटलेला दिसतो. जिथे एकेकाळी मुलांच्या हातात पालक स्वतः पेन्सिल धरून अक्षर गिरवत, तिथे आज त्या प्रक्रियेसाठी ना वेळ उरला, ना संयम.

पहिली ते चौथीपर्यंत पाटीचाच वापर व्हायचा. पाटीवर केलेला अभ्यास शाळेत पुसला जाऊ नये म्हणून मुलं ती जपून ठेवायची. शिक्षकांच्या भीतीपोटी नव्हे, तर शिकण्याच्या जिद्दीपोटी ते अक्षर नीट लिहायचे. मात्र आज पुस्तकांचा ढीग वाढला, पण लेखनाची खोली कमी झाली आहे.

कधीकाळी शाळेत हमखास ऐकू येणारे “शाळा सुटली, पाटी फुटली” हे शब्दही आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पुढील पिढीला या ओळी ऐकायला मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. स्टेशनरी दुकानाबाहेर “पाटी-पेन्सिल मिळेल” अशी पाटी झळकायची. आज त्याच पाट्या किराणा आणि कापड दुकानाबाहेर दर लिहिण्यासाठी वापरल्या जात आहेत.

आधुनिकतेच्या नावाखाली शिक्षण पद्धतीला नवी वळणं मिळत आहेत, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र, मुळांवर घाव घालून वाढ कशी साधायची? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण पाटी-पेन्सिल फक्त एक साधन नव्हतं, तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाची पहिली पायरी होतं.

आज गरज आहे, डिजिटल शिक्षणासोबत पारंपरिक पाटी-पेन्सिल संस्कृती टिकवण्याची. नाहीतर उद्याची पिढी ‘सुंदर अक्षर’ हा शब्द केवळ पुस्तकातच वाचेल आणि स्वतः लिहू मात्र शकणार नाही.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही