रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नांना यश ; अज्ञात मृतदेह लखमापुरात आढळला

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील शिवणीजवळ अडाण नदीच्या प्रवाहात वाहत गेलेल्या अनोळखी मृतदेहाचा अखेर पाचव्या दिवशी शोध लागला. लखमापूर परिसरात हा मृतदेह आढळून आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
१६ सप्टेंबर रोजी सकाळी शिवणी गावाजवळील पुलावरून नदीत एक पुरुष जातीचा मृतदेह वाहून जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती तहसीलदार रवींद्र राठोड व मंगरुळपीर पोलिस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर धावळे यांना मिळताच त्यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दिपक सदाफळे यांना तातडीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यास सांगितले.
यानंतर जीवनरक्षक दिपक सदाफळे यांच्यासह सहकारी अतुल उमाळे, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, शुभम भोपळे, निलेश खंडारे व विकास सदांशिव यांनी बोट व शोध साहित्याच्या मदतीने सलग पाच दिवस शोधमोहीम सुरू ठेवली. नदीला मोठा पुर असल्याने जोरदार प्रवाह, धारांचा खळखळाट, भवरे, तसेच घनदाट झाडाझुडपांमुळे मोहीमेस सतत अडथळे येत होते. तरीही पथकाने हार न मानता सर्च ऑपरेशन सुरू ठेवले.
अखेर पाचव्या दिवशी म्हणजे २० सप्टेंबर रोजी लखमापूर परिसरात हा मृतदेह आढळला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व नियमानुसार दफनविधी पार पाडला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संतोष क्षिरसागर पुढील तपास करीत आहेत.