विदर्भ

पावसाचा कहर ; नाल्यात वाहून चिमुकल्याचा मृत्यू

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

सतत सुरू असलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. या मुसळधार पावसात गोंडेगाव येथे हृदयद्रावक घटना घडली. चार वर्षीय स्वराज अशोक खिल्लारे हा चिमुकला सिमेंट नाल्यात पडून वाहून गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्वराज हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील जामठी गावचा रहिवासी होता. त्याची आई सध्या माहेरी गोंडेगाव येथे आली होती. शनिवारी सकाळी स्वराज घराबाहेर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या नाल्यात त्याचा पाय घसरला. त्या वेळी नाल्यातील प्रवाह प्रचंड वेगाने होता. त्यामुळे तो दिसेनासा झाला. काही वेळातच घरच्यांनी शोध सुरू केला. परंतु तो सापडत नसल्याने गावकरी, नातेवाईक सर्वजण शोधमोहीमेत सहभागी झाले.

सुमारे तासाभरानंतर जेसीबीच्या साहाय्याने नाल्याची खोदाई करण्यात आली. तेव्हा स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला आणि तिच्या आक्रोशाने गावभर शोककळा पसरली.

एका क्षणात खेळता-बोलता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गोंडेगाव गाव सुन्न झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही