पुतळा, स्मारक, अभ्यासिका ; स्वाभिमानी आंबेडकरी समाजाची मागणी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये भव्य स्मारक, तेजस्वी नवा पुतळा आणि अभ्यासिका उभारण्यासाठी १२ कोटी रुपये निधी मिळावा, अशी ठाम मागणी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी नुकतीच निवेदनाद्वारे केली. ही मागणी आता थेट राज्य शासनाच्या निर्णय प्रक्रियेपुढे ठामपणे उभी राहत आहे.
डॉ. कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, मिरज शहरात बौद्ध व बहुजन समाजाची घनघोर लोकसंख्या असताना देखील, आजतागायत या समाजासाठी बाबासाहेबांच्या स्मारकाच्या स्वरूपात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक जाणिवांना साजेशी अशी स्मारक उभारणी ही केवळ सौंदर्य किंवा भावनिक गोष्ट नसून, ती आत्मसन्मानाचा भाग असल्याचे ते म्हणाले.
विशेषतः आरक्षित मतदारसंघातून निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी या समाजाच्या हक्कांसाठी लढा द्यायला हवा होता. मात्र, असे न होता, बाबासाहेबांचे नाव केवळ उद्घाटनाच्या फलकांवर झळकते, आणि प्रत्यक्ष कृतीतून त्या विचारांचा ठसा उमटत नाही, अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली.
आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वारामध्ये असलेल्या प्रशस्त मोकळ्या जागेचा उपयोग करून, त्या ठिकाणी जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आणि अभ्यासिका उभारण्यात यावी, अशी ठोस मागणी त्यांनी केली आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि युवा पिढीला अभ्यासाची संधी मिळण्यासाठी अभ्यासिकेची स्थापना अत्यंत महत्त्वाची आहे.
याचबरोबर, ग्रामीण भागातील सलगरे, आरग, बेडग, मालगाव आणि कवलापूर या गावांमध्ये संविधान भवन उभारण्यात यावीत, अशीही जोरदार विनंती करण्यात आली आहे. या संविधान भवनांमध्येही अभ्यासिका सुरू करून ग्रामीण भागातील तरुणांना संविधान, कायदे, आणि सामाजिक हक्कांची माहिती देणारे केंद्र उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या सर्व मागण्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पुढाकार घ्यावा आणि या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा कांबळे यांनी व्यक्त केली. हा केवळ निवेदनाचा भाग नसून, “समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता” या संविधानाच्या त्रिसूत्रीची खरी अंमलबजावणी करण्याचा हा संघर्ष असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.