मेहकर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ. सिद्धार्थ खरात यांच्या जनता दरबाराला उस्फूर्त प्रतिसाद

LiVE NEWS | UPDATE
बुलढाणा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी | दीपक देशमुख
मेहकर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या दरबारात तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत मेहकर तालुक्यात कधीच असा व्यापक लोकसंपर्क कार्यक्रम झाल्याचे दिसून आले नव्हते.
या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या शेती, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ग्रामविकास, महिला समस्या आदी विषयांवरील तक्रारी आणि अडचणी थेट आमदार खरात यांच्या समोर मांडल्या. दरबारात शेतकरी, महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. अनेक नागरिकांनी शासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याची खंत व्यक्त केली.
नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. शासन आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी पगार देते, त्यामुळे अधिकारी वर्गाने जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ निराकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरबारादरम्यान शेतकरी व नागरिकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना सांगितले की, आजपर्यंत मेहकरमध्ये कोणीही आमच्या समस्या थेट ऐकल्या नाहीत पण आज आमदार खरात यांनी आमचे प्रश्न जाणून घेतले, हे आमच्यासाठी दिलासादायक आहे.
जनता दरबारात आलेल्या नागरिकांचा सहभाग आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहता हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. आमदार खरात यांनी लोकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला, ही जनतेसाठी आशेची नवी किरण आहे, असे समाधान अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
मेहकर तालुक्यातील पहिलाच असा जनता दरबार लोकाभिमुख ठरला, तर नागरिकांनी याची दखल घेत आ. सिद्धार्थ खरात यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.