पूर्व वैमनस्यातून तरुणावर गोळीबार व दुकानाची तोडफोड ; एकास अटक

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | जुना वाद उफाळून आल्यानंतर चर्चजवळील सलून दुकानातच तरुणावर गोळीबार व दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य फरार संशयित आरोपीस मिरज पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य संशयित आरोपी गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी (वय २६, वडर गल्ली, मंगळवार पेठ, मिरज) यास पोलिसांनी अटक केले असून फरार तीन संशयितांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (ता. १८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरातील एका सलून दुकानात रोहन कलगुटगी बसला होता. यावेळी गणेश याच्यासह चेतन कलगुटगी (वय २८, वडर गल्ली, मिरज), अमीर फौजदार (वय २५, माणिकनगर, मिरज) आणि सूरज कोरे (वय २५, ढेरे गल्ली, मिरज) असे चौघे तिथे आले. त्यातील एकाने पूर्वीच्या वादातून रोहनवर गोळीबार केला. रोहनने ही गोळी चुकवली. संशयितांकडून कोयत्यानेही हल्ला करण्यात आल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी घटनेनंतर संशयितांचा तपास सुरू केला. चार संशयितांपैकी मुख्य संशयितास गुरुवारी शहरातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तुल, अन्य तीन संशयितांचा शोध सुरू असल्याचे मिरज शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी सांगितले