गुन्हे विश्व्विदर्भ

पोलीस ठाण्यातच सुरक्षित नाही गुन्हेगार ; मग जनता कुठे सुरक्षित?

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

शिरपूर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून सराईत गुन्हेगार पळाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारच पोलिसांच्या हातातून पळत असेल, तर सामान्य नागरिकांचा जीव कुठे सुरक्षित राहणार, असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच नाही, तर त्यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले जात आहे.

घटनेचा तपशील असा की, गोपाल विजय पवार (रा. पांगरखेडा) हा सराईत गुन्हेगार ७ ऑक्टोबर रोजी विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन शिरपूर पोलिस ठाण्याच्या कोठडीत डांबला होता. मात्र, काल रात्री सुमारे ११:३० वाजता त्याने शौचास जाण्याचा बहाणा करून ड्युटीवरील पोलिसाला जवळ बोलावले. त्या वेळी त्याने पोलिसाच्या हाताला झटका देत अक्षरशः डोळ्यादोरातून पोलीस ठाण्याचा दरवाजा ओलांडला आणि अंधारात गायब झाला.

पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि काही स्थानिक तरुणांनी पाठलाग केला, पण शेतातील पिके आणि अंधाराचा फायदा घेत आरोपीने पळून जाण्यात यश मिळवले. यानंतर पोलिसांनी शोधपथके तयार केली, परिसरात नाकेबंदी केली, पण आरोपीचा अद्याप काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.

हा तोच गोपाल पवार ज्याच्यावर वाशिम आणि इतर ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एवढं असूनही त्याला हलगर्जीपणे कोठडीत ठेवण्यात आलं आणि त्याच हलगर्जीपणाचा फायदा घेत त्याने फरार होण्यात यश मिळवलं.

दरम्यान, शिरपूर पोलिस ठाण्यात गेल्या काही दिवसांत एकाहून एक गुन्हे वाढले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता, आणि त्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. अशा घटनांमुळे शिरपूर परिसरात पोलिसांचा वचक संपल्याचे स्पष्ट दिसून येते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही