प्रतिबंधित गुटखा तंबाखूचा काळा बाजार ; ‘महात्मा गांधी” पोलिसांचा तस्करांवर प्रहार
पाच आरोपी जेरबंद ; कर्तव्यदक्ष पोलिसांचे सर्वञ कौतुक

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
महाराष्ट्र व कर्नाटकात गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याची बिनधास्त तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या अखेर आवळण्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याला यश आलंय. तब्बल १७ लाख ९५ हजार ८४४ रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त करत पोलिसांनी या काळ्याधंद्याला दणदणीत चपराक दिली आहे. पाच तस्करांना अटक करण्यात आली असून सांगली जिल्ह्यात मोठा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथक, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अफरोज पठाण यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई केली. ही सुरुवात मुख्तार मेहबूब मुजावर (रा. बिसूर) याच्या अटकेने झाली. त्याच्याकडून तब्बल ८२ हजार ६०० रुपयांचा गुटखा व पानमसाला हस्तगत करण्यात आला. त्यानंतर सुरू झालेला तपास काही तासांतच एका मोठ्या टोळीपर्यंत पोहोचला.
या साखळीचाच पुढचा भाग उकलत पोलिसांनी सलीम गुरुसाब आवटी (शाहूनगर, बेळगाव), उमेश शंकर पाटील (रतुगल्ली, कुडची), नयुम दिलावर शेख (गणेशनगर) आणि भरतेश सिद्धराम कुडचे (नदीवेस, मिरज) या चौघांनाही अटक केली. हे सर्वजण कर्नाटकातून गुटख्याचा साठा आणून सांगली जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना चढ्या दराने पुरवत होते, अशी माहिती पुढे आली आहे.
सदरची ही मालवाहतूक शिताफीने राबवली जात होती. पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या डोळ्यांत धूळ टाकून जिल्ह्याला नशेच्या विळख्यात ओढण्याचा डाव होता, पण पोलीसांनी याला वेळीच रोखले. या पाचही जणांकडून १७ लाख ९५ हजार ८४४ रुपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासह वाहने आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
या आंतरराज्य टोळीने महाराष्ट्रात गुटख्याची पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने दिलेल्या या दणक्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पुढील अधिक तपास सुरू असून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात गुटख्याच्या विक्रीला ऊत आला होता. मात्र आता पोलिसांनी हा काळा धंदा बंद करण्याची चकमक सुरू केली आहे. या कारवाईमुळे सामान्य जनतेमध्ये पोलिसांबद्दल समाधान व्यक्त होत आहे.