फेब्रुवारीचा हप्ता रखडला ; ‘लाडकी बहीण’ लाभार्थींचा जीव टांगणीला
फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता ; महिलांचे शासनाकडे लक्ष

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने वाशिम जिल्ह्यासह मंगरूळपीर तालुक्यातील महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्च महिन्याची दहावी तारीख उलटून गेली असतानाही हप्ता जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिला प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र, मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे.
फेब्रुवारीचा हप्ता का रखडला?
सामान्यतः या योजनेचे हप्ते महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा केले जातात. मात्र, फेब्रुवारी महिना संपून मार्चचे दहा दिवस उलटले तरी अनेक महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा संदेश आलेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, लाभार्थींच्या तपशीलांची तांत्रिक पडताळणी तसेच निधी वितरणाच्या प्रक्रियेमुळे काही प्रमाणात विलंब होत असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, शासनाकडून हप्ता वितरणाबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
३००० रुपये एकाच वेळी मिळण्याची शक्यता
फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याबाबत मंत्रालयीन स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही काही तांत्रिक कारणांमुळे हप्ते उशिरा वितरित झाले असताना सरकारने दोन महिन्यांचे पैसे एकत्रित दिले होते. त्याच पद्धतीने यावेळीही मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास गुढीपाडव्याच्या तोंडावर महिलांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
ई-केवायसी (KYC) अपडेट नसल्यास अडचण
हप्ता वितरणात विलंब होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे काही लाभार्थींच्या ‘केवायसी’ प्रक्रियेत असलेल्या त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांची आधार लिंक किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात. ज्या लाभार्थींच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या, त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार जोडणी व केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाकडून स्पष्टतेची प्रतीक्षा
योजनेच्या सुरुवातीला वेळेवर हप्ते मिळत असल्यामुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, सध्या होत असलेल्या विलंबामुळे काही लाभार्थी महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
आम्ही दर महिन्याला या पैशांची वाट पाहतो. आता मार्च महिना सुरू झाला तरी फेब्रुवारीचे पैसे आलेले नाहीत. शासनाने याबाबत लवकर स्पष्टता द्यावी, अशी प्रतिक्रिया मंगरूळपीर येथील लाभार्थी प्रज्ञा भगत यांनी व्यक्त केली.
आगामी सण-उत्सव आणि घरगुती गरजा लक्षात घेता शासन मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सरकार फेब्रुवारीचा स्वतंत्र हप्ता जमा करणार की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रित देणार, याकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.