
LiVE NEWS | UPDATE
जालना | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
धनगर समाज बांधवांच्या मागण्यांसाठी मागील अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला आज महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली. उपोषणकर्ते श्री. दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण स्थळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
मंत्री महाजन यांनी उपोषणकर्त्यांना विश्वास दिला की, धनगर समाजाच्या मागण्या संविधानाच्या चौकटीत बसवून सोडवाव्या लागतील. यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात येईल. या भेटीदरम्यान स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनीही श्री. बोऱ्हाडे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत समाजाच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. तसेच धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेल याची ग्वाही देत लेखी पत्र देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर, नारायण कुचे, अर्जुन खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण आदी मान्यवर उपस्थित होते. उपोषण स्थळी झालेल्या या चर्चेमुळे उपोषणकर्ते आणि समाज बांधवांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
धनगर समाजाचे आरक्षण हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा ज्वलंत मुद्दा असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने समाजामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत या विषयावर ठोस निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा समाजात व्यक्त केली जात आहे.