आर्थिकमहाराष्ट्र

बोंद्रीच्या ग्रामदैवत जानाईदेवी मंदिर जिर्णोद्धारासाठी भाविकांना सढळ हाताने मदतीचे आवाहन

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | संजय कांबळे

पाटण | केरा विभागातील प्रसिद्ध बोंद्री गावचे ग्रामदैवत श्री जानाईदेवी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिर जिर्णोद्धार समितीच्या वतीने भाविक भक्त, दानशूर व्यक्ती, संस्था आणि विविध मंडळांकडे सढळ हाताने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बोंद्री गावची आराध्यदैवत असलेली श्री जानाईदेवी ही बारा थळांची मालकीण म्हणून ओळखली जाते. परिसरातील सर्वात अगोदर मान असलेली ही देवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. माहेरवाशीनींच्या तसेच भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा आणि उत्सवांच्या माध्यमातून मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होत असते.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बोंद्री गावाच्या मध्यभागी गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, सध्याची मंदिराची इमारत जुनी व जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी दुरुस्तीची अत्यंत गरज भासू लागली आहे. भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी भव्य व सुरक्षित मंदिर उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला.

त्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग आणि महिला मंडळांनी एकत्र येत श्री जानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार समितीची स्थापना केली आहे. समितीच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने कामास प्रारंभ करण्यात आला असून मंदिराच्या नव्या आराखड्याची तयारी, बांधकाम साहित्याची जुळवाजुळव आणि निधी संकलन मोहीम सुरू आहे.

समिती सदस्य रात्रंदिवस परिश्रम घेत असून गावकऱ्यांकडून तसेच बाहेरगावी स्थायिक झालेल्या माहेरवाशीनींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक भाविकांनी आपापल्या परीने आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली असून देणगीचा ओघ हळूहळू वाढत आहे. तरीदेखील मंदिर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती, विविध सामाजिक संस्था व मंडळांनी पुढाकार घेऊन या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“हे मंदिर केवळ बांधकाम नसून गावाच्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. भाविकांच्या सहकार्यामुळेच हे स्वप्न साकार होईल,” असा विश्वास मंदिर जिर्णोद्धार समितीने व्यक्त केला आहे.

जानाईदेवी मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या या सत्कार्यास समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने हातभार लावून बोंद्री गावाच्या धार्मिक वैभवात भर घालावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही