महाराष्ट्रसामाजिक

धाराशिवमध्ये पूरसंकट ; शिवसैनिक झाले जीवनरक्षक

धाराशिव | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

परंडा प्रतिनिधी | धाराशिव जिल्ह्यातील वडनेर (ता. परंडा) येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. गावातील एका कुटुंबावर मात्र मोठे संकट कोसळले. रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गावातील एकाच कुटुंबातील चार सदस्य घराच्या छतावर अडकले होते. त्यात आजी, दोन वर्षांचा चिमुकला आणि दोन व्यक्तींचा समावेश होता. वाढत्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगाची माहिती समजताच शिवसेना (शिंदे गट) खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ NDRF च्या जवानांशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. जवानांच्या बरोबर गावकऱ्यांनीही मोठ्या धैर्याने बचावकार्याला हातभार लावला. तणावपूर्ण वातावरणात चाललेल्या या मोहिमेत चारही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

खासदार निंबाळकर यांनी स्वतः पाण्यात उतरून गावकऱ्यांना धीर दिला व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. त्यांच्या या पुढाकारामुळेच जीवघेण्या संकटातून एका कुटुंबाला नवजीवन मिळाले. गावकऱ्यांनी या कार्याची प्रशंसा करताना म्हटले की, बाळासाहेबांचे शिवसैनिक हे फक्त शब्दांनी नव्हे, तर कृतीतून धडाडी दाखवतात, त्याची प्रचिती आज आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील या घटनेमुळे शिवसैनिकांची जनसामान्यांमधील प्रतिमा आणखी बळकट झाली आहे. संकटाच्या काळात धावून जाणारा नेता आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले गावकरी व जवान यामुळे पुन्हा एकदा सामूहिक कार्यशक्तीची ताकद सिद्ध झाली आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही