भाजपाला रामराम ; संजय काका पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश, तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकेक पक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यात संजयकाका पाटील यांना तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी भाजपाच्या तिकिटावर सांगली येथून निवडणूक लढवली होती. परंतु, त्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांचा पराभव झाला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी संजयकाका पाटील यांनी भाजपाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजयकाका पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश करताच तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील हे तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. याच मतदारसंघात शरद पवार गटाकडून दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात संजयकाका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.
आता रोहित पाटील यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. मात्र, ते ते कॅमेराजीवी, टीआरपी मिळवण्याची धडपड करणारे नेते आहेत. मतदारसंघात काम कसे करायचे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे रोहित पाटील यांचे आव्हान मी मानत नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटात प्रवेश केल्यामुळे भाजपा आणि आमच्यात कोणतीही धुसफुस नसेल. सर्वच कार्यकर्ते एकत्र येत निवडणूक लढवणार आहेत, असा विश्वास संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. लोकसभेला भाजपाने संजय काका पाटील यांनी उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष असलेले विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाला होता. संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला होता.