मिरजेतील जनावर बाजार ठप्प ; धरपकडीच्या भीतीने बेपारी समाज आक्रमक ; मटण दुकानेही बेमुदत बंद

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज शहरातील जनावर बाजारात सध्या शुकशुकाट पसरलेला आहे. बाजारात जनावरे आहेत, पण खरेदीदार मात्र नाहीत. जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामागील कारण म्हणजे बेपारी समाजाचा शासनाविरोधात भडकलेला संताप. सध्या राज्यभरात जनावरे वाहतूक करताना काही संघटनांकडून सर्रास धरपकड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बेपारी समाजाने एकजूट होत आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे.
सोमवारी मिरजमधील अर्बन हॉल येथे जमीयतूल कुरेश यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड आदी भागातील शेकडो बेपारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीयतचे मिरज शहराध्यक्ष हाजी इरफान बेपारी होते.
बैठकीत सध्या सुरू असलेल्या धरपकडीविरोधात संताप व्यक्त करत शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी दर्शवण्यात आली. बेपारी समाजाचे म्हणणे आहे की, जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाताना काही संघटना विनाकारण अडथळे निर्माण करत आहेत. वाहनांची धरपकड, अपमानास्पद वागणूक, आर्थिक नुकसान या साऱ्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
या संतापाचा उद्रेक म्हणून बेपारी समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला असून, मिरज शहरातही त्याला ठोस पाठिंबा देण्यात आला आहे. बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की, बुधवारपासून मिरज शहरातील सर्व जनावर बाजार, मटण दुकाने आणि जनावर खरेदी-विक्री बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत.
हा निर्णय लागू झाल्यापासून मिरजमधील जनावर बाजार पूर्णपणे ठप्प झाला आहे. हजारो जनावरे बाजारात असूनही, कुठलाही व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नाही. बाजारात रोज लाखोंची उलाढाल होत असते, पण या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवसाय थांबवला आहे. परिणामी बाजारात एक प्रकारचा अघोषित संचारबंदीचा माहौल निर्माण झाला आहे.
बेपारी समाजाची मागणी स्पष्ट आहे. शासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून संघटनांकडून होणाऱ्या विनाकारण धरपकडीला आळा घालावा. अन्यथा, ही आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल. शासनाने याप्रकरणी दुर्लक्ष केल्यास जनावर व्यापार आणि मटण व्यवसाय यांच्यावर कायमस्वरूपी गंडांतर येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.