मंगरुळपीर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक यशस्वीरित्या पार
कावड मिरवणूक व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज, शांतता राखण्याचे नागरिकांचे आश्वासन

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दिनांक १६ जुलै रोजी श्रावण मासातील कावड यात्रेसह आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विविध कावड मंडळांचे प्रतिनिधी, नागरिक, पोलीस अधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत आगामी धार्मिक सण शांततेत व सामंजस्यपूर्ण वातावरणात पार पाडावेत यावर भर देण्यात आला. कावड यात्रेप्रमाणेच श्री गणेशोत्सवाच्या आयोजनावेळी उद्भवणाऱ्या अडचणी, समस्या व उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेषतः कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, रस्त्यांची वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, वीजपुरवठा, साउंड सिस्टिमचे नियमन आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी नागरिकांना शांततेच्या मार्गाने सण साजरे करण्याचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सोशल मीडियावर कोणत्याही आक्षेपार्ह, द्वेषमूलक किंवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्स टाळाव्यात, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सत्य माहिती मिळवून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली.
कावड यात्रा हा श्रद्धेचा व भक्तीभावाचा विषय आहे. त्यामुळे यात्रेच्या वेळी कोणतीही अनुशासनभंग किंवा कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. याशिवाय, मार्गातील स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा व नागरिकांच्या मूलभूत गरजांवरही भर देण्यात आला.
सदर बैठकीत उपस्थित असलेल्या कावड मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे व सण पारंपरिक आणि शांततेत पार पाडण्याचे आश्वासन दिले. सर्वांनी मिळून कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करू, असा विश्वास व्यक्त केला.
शेवटी, पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोणताही अनुचित प्रसंग टाळण्याचे आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन नागरिकांनी दिले. बैठकीचा उद्देश पूर्णत्वास गेला असून मंगरुळपीर शहरातील शांतता समितीची बैठक ही यशस्वी आणि फलदायी ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.