मंगरुळपीर येथे प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद क्रीडा संकुल मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला. सकाळी ९.१५ वाजता उपविभागीय अधिकारी रवि अरुण काळे यांच्या शुभहस्ते शासकीय ध्वजारोहण व ध्वजवंदन संपन्न झाले. यावेळी तहसीलदार सुधाकर अनासुने, आमदार शाम खोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षीरसागर, ठाणेदार किशोर शेळके, नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर, उपाध्यक्ष अनिल गावंडे, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पी.एम.श्री. जि.प. माध्यमिक विद्यालयाच्या गीतमंच चमूने राष्ट्रगीत, राज्यगीत व स्फूर्तिगीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. त्यानंतर पोलीस, होमगार्ड (पुरुष व महिला), एन.सी.सी., एम.सी.सी., स्काऊट-गाईड, हरितसेना, एन.एस.एस. आदी पथकांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून ध्वजाला मानवंदना दिली.
यानंतर निवासी नायब तहसीलदार रवि राठोड यांनी जलतारा शोषखड्ड्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. भव्य रंगमंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग नोंदविला. विविध गटांतील स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शाळांना बक्षिसे जाहीर करण्यात आली.
मतदार जनजागृती स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थी, बी.एल.ओ., गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, माजी सैनिक तसेच सामाजिक व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आमदार शाम खोडे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्हे, पदके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. पुढील प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या शाळांना आकर्षक रोख बक्षिसे देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार रवि राठोड यांनी केले. विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस व स्वयंसेवी पथकांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.