मंगरूळपीर तालुक्यात शेतकरी पिकांची कोळपणी आणि किटकनाशक फवारणीत व्यस्त
खरीप हंगामात गोगलगाय व अळींचा प्रादुर्भाव; औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरूळपीर तालुक्यातील बहुतांश शेतकरी सध्या खरीप हंगामातील शेती कामांमध्ये व्यस्त आहेत. यंदाच्या रोहिणी, मृग व नंतरच्या आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य नक्षत्रांमध्ये मधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने काही भागातील पिकांना थोडासा आधार मिळाला असला, तरी अजूनही सुमारे २० टक्के भागात पेरणीची कामे सुरू आहेत.
गेल्या बारा दिवसांत झालेल्या सततच्या हलक्या पावसामुळे सोयाबीन, मुग, उडीद, तूर आदी पिकांवर गोगलगाय व पाने कुरतडणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, शेतकरी औषध फवारणी, कोळपणी व तणनाशक फवारणी यामध्ये पूर्णपणे गुंतलेले दिसत आहेत.
मंगरूळपीर तालुक्यात खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून येथील बहुतांश शेती कोरडवाहू स्वरूपाची आहे. त्यामुळे संपूर्ण शेती व्यवस्थापन निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असते. पेरणीनंतर दीर्घकाल पाऊस न झाल्याने पीक मरणप्राय अवस्थेत गेले होते. मात्र, पुनर्वसू व पुष्य नक्षत्रात झालेल्या संततधार पावसामुळे काही प्रमाणात बहर आलेल्या पिकांवर कीटकनाशक व तणनाशक औषधांची फवारणी करण्यास शेतकरी उत्साहाने लागले आहेत.
आता येणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त होत असून त्यावरच पिकांचा पुढील विकास अवलंबून आहे. मघा नक्षत्रात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता आश्लेषा नक्षत्राकडे लागले आहे.
सध्या वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन, उडिद, मुग, तूर यांसारख्या पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे शेतकरी महागडी कीटकनाशके व औषधांची फवारणी करत आहेत. एका एकरासाठी फवारणीचा खर्च सुमारे दोन हजार रुपये येत असून, कोळपणीसाठी देखील एकरी हजार रुपयांचा खर्च होत आहे, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
सततच्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण उगवले आहे. त्यामुळे पिकांचे पोषण कमी होत असून, उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी तणनाशकांची फवारणीही करत आहेत.
दरम्यान, शहर व ग्रामीण भागात पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून वाहतुकीला अडथळे येत आहेत. तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे देखील शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी अडचणी येत आहेत.
एकूणच यंदाचा खरीप हंगाम पावसावर अवलंबून असून, येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला तरच शेतकऱ्यांच्या आशा फळाला येतील. सध्या मात्र शेतकरी रात्रंदिवस मेहनत करत आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी धडपड करत आहेत.