
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | शासनाच्या आदेशाला केराची टोपली. पण, मंत्र्यांच्या झापडीनं आली महापालिकेला अक्कल…. सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अचानक कार्यकर्तृत्वाची झिंग चढली आणि मिरज शासकीय रुग्णालय परिसरात लपलेली अनधिकृत अतिक्रमणं एका रात्रीत जमीनदोस्त झाली.
मिरजच्या सिव्हिल चौक परिसरातील शासकीय रुग्णालय हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले होते. डॉक्टरांची तक्रार, नागरिकांचे ओरड, आरोग्यसेवेवर पडणारा परिणाम पण तरीही अतिक्रमण विभाग गप्प बसून कानाडोळा करत महापालिकेचे अधिकारी नेहमीप्रमाणे झोपले होते. पण मंत्रीसाहेबांनी दौरा केल्यानंतर अचानक झोप उडाली आणि सोमवारी रात्री उशिरा महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने ‘हातोडा मोहिम’ सुरू केली.

सिव्हिल चौकाच्या परिसरातील १३ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला. खाद्यपदार्थ विक्री, पान टपऱ्या, हॉटेल्स, किरकोळ दुकाने यांच्यावर कोसळलेल्या या कारवाईचा जोर नागरिकांनीही अनुभवला. अतिक्रमणकर्त्यांनी उभारलेली कच्ची-पक्की दुकाने अक्षरशः एका रात्रीत जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाईची ‘नुसती धूळधाण’ नव्हती तर महापालिकेच्या बेफिकीरीवर ‘सरळ चपराक’ होती. कारण ही अतिक्रमणे नवीन नव्हती तर ती वर्षानुवर्षं प्रशासनाच्या नजरेआड फोफावत होती. पण मंत्री आले, अधिकाऱ्यांना झापले अन् सगळं ‘स्वच्छ’ केलं गेलं.
महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशावरून ही मोहीम सुरू झाली. अतिक्रमण विरोधी पथकाचे अधीक्षक सचिन सागावकर, सहाय्यक अंनिस मुल्ला व १२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जेसीबी, हातोडे, ट्रक अशा सर्व यंत्रणांच्या साथीने सिव्हिल चौक परिसर पुन्हा “शासकीय” करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या पथकाने स्पष्ट केलं की, शहरातील इतर अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई होणार आहे.
परंतु, नागरिकांतूनही मिस्कील चर्चा रंगली “मंत्री नसते आले, तर अतिक्रमण हटलेच नसते. म्हणजेच ‘हुकूमशाहीची झापड अन् प्रशासनाला जाग’ ही आता नवी निती झाली का? असा सवालही नागरिक करताना दिसत आहेत.