मतदानाचा एक निर्णय ; भविष्याला नवी दिशा ; ‘माझे मत, माझा हक्क, माझी जबाबदारी माझा अभिमान’ मोहिमेला उत्साद

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
लोकशाहीची खरी ताकद सामान्य नागरिकाच्या हातातील मताधिकारात दडलेली आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क ही केवळ एक प्रक्रिया नसून देशनिर्मितीत सहभागी होण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमतर्फे ‘माझे मत–माझा हक्क, माझी जबाबदारी–माझा अभिमान’ ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केले जात आहे.
आजच्या वेगवान बदलत्या युगात रोजगार, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा ते पर्यावरण अशा अनेक समस्या नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित आहेत. या प्रश्नांची योग्य सोडवणूक करण्यासाठी सक्षम व दूरदर्शी नेतृत्वाची निवड आवश्यक असून ही निवड फक्त मतदानातूनच शक्य होते. मतदान टाळणाऱ्या नागरिकांची शासन निर्णयांवरील छाप कमी राहते. त्यामुळे धोरणांबाबत नंतर तक्रार करण्याचा नैतिक अधिकारही कमी होतो. उलट मतदान करून नागरिक प्रक्रियेचा सक्रिय भाग बनतात आणि त्यांचे मत त्यांच्या अपेक्षा व दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते.
तरुण मतदारांचा वाढता उत्साह, महिलांचा मोठा सहभाग आणि ज्येष्ठांची कर्तव्यनिष्ठा हे लोकशाही आरोग्याचे सकारात्मक संकेत आहेत. मतदान केंद्रावर पोहोचणारा प्रत्येक नागरिक देशाच्या भविष्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या बोटावर उमटणारी शाई ही जबाबदारी आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
मतदान ही एका दिवसाची कृती असली तरी तिचा परिणाम पाच वर्षे देशाच्या दिशा व विकासावर प्रभाव टाकतो. म्हणून प्रत्येक नागरिकाने जाणिवेने, अभिमानाने व जबाबदारीने मतदान करणे अत्यावश्यक आहे.
चला, लोकशाहीला बळकटी देऊ, चला, मतदान करूया जाणिवेने, अभिमानाने आणि जबाबदारीने.