मतदान सुरू, ईव्हीएम बंद ; मतदार संतप्त, आयोगाचा ढिसाळ कारभार

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली खरी, पण ही सुरुवात लोकशाहीचा उत्सव ठरण्याऐवजी निवडणूक यंत्रणेच्या अपयशाची जाहीर कबुली ठरली. 2869 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 15 हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात असताना, मतदानाच्या पहिल्याच तासात ईव्हीएम बिघाड, मतदार यादीतील घोळ आणि नियोजनाचा बोजवारा उडाल्याने लोकशाहीच अडखळल्याचे भयावह चित्र समोर आले.
सकाळी-सकाळी मतदान करून मोकळे व्हावे, या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या मतदारांच्या पदरी मात्र, रांगा, संताप आणि अपमान आला. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन सुरूच होत नव्हती. कुठे लाईट लागत नव्हती, कुठे बटण दाबूनही प्रतिसाद नाही, तर कुठे आवाजच येत नव्हता. काही ठिकाणी मशीन तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिरा सुरू झाली, तर काही ठिकाणी सुरू असलेली ईव्हीएम अचानक बंद पडून मतदान पूर्णतः ठप्प झाले. हा तांत्रिक बिघाड नसून निवडणूक आयोगाच्या ढिसाळ तयारीचा ठोस पुरावा असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.
या सगळ्याचा सर्वात मोठा फटका बसला तो मतदारांना. सकाळपासून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या. उन्हात, वेळेअभावी आणि गोंधळात मतदार तासनतास अडकले. त्यात भर म्हणजे अनेक ठिकाणी मतदार यादीत नावेच नसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले. सामान्य मतदार तर दूरच, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही आमदार आणि मंत्र्यांचीही नावे यादीत नसल्याचे समोर आले आहे. ही बाब म्हणजे निवडणूक प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळस असून, हेच लोक लोकशाही राबवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या अकार्यक्षमतेमुळे अनेक मतदान केंद्रांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची, वाद, गोंधळ आणि गदारोळ झाल्याच्या घटना घडल्या. ईव्हीएम दुरुस्तीच्या नावाखाली मतदान खोळंबले असताना, मतदारांचा संयम सुटू लागला. ईव्हीएम वर विश्वास नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान का घेत नाहीत? असा थेट सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
लोकशाहीचा सण अशा प्रकारे बिघडवणे हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे, तर लोकशाहीविरोधी पाप असल्याची भावना जनतेत बळावत आहे. मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र तोच हक्क बजावताना जर नागरिकांना त्रास, अपमान आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत असेल, तर निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते.
एकीकडे उमेदवारांची प्रचंड गर्दी, तर दुसरीकडे प्रशासनाची शून्य तयारी या दोहोंच्या कात्रीत आज मतदार भरडला गेला आहे. जर हा गोंधळ तातडीने नियंत्रणात आणला गेला नाही, तर केवळ मतदानाचा उत्साहच नव्हे, तर लोकशाहीवरील विश्वासही कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.