मनपाची झडती, प्लास्टिकवाल्यांची गडबड वाढली ; दंडाच्या बातमीनं गल्ली हादरली

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर धडक कारवाई करत व्यापाऱ्यांचे अक्षरशः धाबे दणाणवले. मिरजमधील व्यापारी गल्लीबोळात आज मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने तपासणी मोहिम राबवून १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार, मा. अतिरिक्त आयुक्त आणि मा. उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी श्री. याकुब मद्रासी व श्री. अतुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्र. ४ अंतर्गत वॉर्ड क्रमांक ३, ४, ५, ६ आणि २० या व्यापारी भागात प्लास्टिक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत सिंगल यूज प्लास्टिकचा साठा व वापर करणाऱ्या १३ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे एकूण २६,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या एका व्यापाऱ्यावर तब्बल ७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या दोन्ही कारवायांमधून मनपाने एकूण ३३,००० रुपये इतका दंड आकारून प्लास्टिक वापरणाऱ्यांना इशारा दिला.
मनपाने व्यापारी व नागरिकांना आवाहन केले की, “प्लास्टिक वापर टाळा, कचरा रस्त्यावर टाकू नका, शहर सुंदर ठेवा.” तसेच “स्वच्छ शहर, सुंदर शहर” या अभियानाखाली सुरू असलेली ही मोहीम आगामी दिवसांत अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप, नितीन कांबळे, सचिन वाघमोडे, पंकज घनके आणि महेश कांबळे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.