महाआघाडीत ‘मिरज’ मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न : उपरा आणि आयात उमेदवार नको – कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिरज विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षालाच मिळावा, यासाठी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. उबाठा शिवसेनेने या मतदारसंघावर यापूर्वीच दावा केलेला आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार सर्वे मध्ये काँग्रेसला हा मतदारसंघ अनुकूल असल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मतदार संघ जरी आपल्या पक्षाला मिळाला तरी या ठिकाणी पक्षाशी एकनिष्ठ आणि स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी, अन्य मतदारसंघातील ‘उपरा’ किंवा अन्य पक्षातून येवू पाहणारा ‘आयात’ उमेदवार देऊ नये अशी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका आहे.
काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. काँग्रेसला वातावरण चांगलं आहे. मात्र, पक्षाचे काम करणारा निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी. अशी स्थानिकांची भूमिका आहे. भाजपाशी कायम स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करायचा. आणि वातावरण चांगल झाल की, मात्र अन्य मतदारसंघ किंवा अन्य पक्षातून उमेदवार आयात करायचा म्हणजे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यावर एक प्रकारचा अन्यायच आहे. अशी भूमिका काँग्रेसचे कार्यकर्ते मांडत आहेत. लोकसभा निवडणुकीत मिरज मतदार संघाने काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराला भरपूर मतदान दिल आहे. त्यामुळे आता विधानसभेला मिरज हा काँग्रेसलाच मतदार संघ मिळावा आणि निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी अशी आक्रमक भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मिरजेतील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका सुद्धा निष्ठावान शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी अशीच आहे. याबाबत वरिष्ठांना दोन दिवसात स्थानिक शिवसैनिकांची भूमिका कळवण्यात येणार आहे. अशी सूत्रांची माहिती आहे.