महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ; 10 लाखांची मागणी, 7 लाख पडले महागात

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
सांगली महापालिका क्षेत्रातील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाच घेताना लाजलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडला आहे. 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 7 लाखावर सहमती झाल्याने एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आहे. या प्रकरणात सांगली महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांच्याकडे अर्ज केला होता. परवानगी मिळण्यासाठी साबळे यांनी 10 लाख रुपये लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार नोंदवली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करत सापळा रचून साबळे यांना सात लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील लाचखोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी एसीबीने धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. यापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे उपजिल्हाधिकारी आणि लिपिकाला 5 लाख रुपये लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता सांगलीतील या कारवाईने वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे. साबळे यांच्या घरी आणि कार्यालयात झडती सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे सांगली महापालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनातील पारदर्शकतेची मागणी जोर धरू लागली आहे.